हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांनी महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे राज्यभर दौरे करणार असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भात माहीती दिली. राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर ते बोलत होते.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला 6 डिसेंबरपासून सुरुवात होईल. राज ठाकरे 6 डिसेंबरला पुण्यात जाणार आहेत. त्यानंतर 14 डिसेंबरपासून राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरु होणार आहे. ते 14 तारखेला औरंगाबादला दाखल होतील. त्यानंतर 16 डिसेंबरला पुण्यात पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्षांतर्गत विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर कोकण विभागात राज ठाकरे जाणार असून तिथली बैठक रत्नागिरीत होईल, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. मात्र, ही बैठक नेमकी किती तारखेला होईल, याविषयी अंतिम निर्णय व्हायचा असल्याचं ते म्हणाले.