मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपलं खातं उघडलं आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांना ८६,२२३ मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झूंज दिली. रमेश म्हात्रे यांना ८०,६६५ मते मिळाली आहेत.
सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच राजू पाटील यांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंनी त्यांना कडवी टक्कर दिली. अनेकदा राजू पाटील आणि रमेश म्हात्रे यांच्या मतांमध्ये अवघ्या काही शेकडो मतांचा फरक दिसत होता. अखेर राजू पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसेनं पहिल्या विजयाची नोंद केली. मनसेला कल्याण ग्रामीणमध्ये यश मिळेल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.