हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मास्क न घालण्यावरून जोरदार टोला लगावला. मास्क घालण्यात लाज कसली असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यावर आता मनसे कडून थेट प्रत्युत्तर आले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे बोलत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
संदीप देशपांडे म्हणाले, गेल्या वर्षभरात राज ठाकरे अनेकांना भेटले. डबेवाले, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक, शिक्षक, मच्छिमार बांधव असोत, या सर्वांना राज ठाकरे भेटले. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सातत्याने आणि नियमितपणे राज ठाकरे यांनी केले. आमच्यावर टीका करण्याचा तुम्हांला बिलकूल अधिकार नाही.
तुम्ही घरी बसून होता आणि राज ठाकरे जनतेला भेटत होते. गेल्या वर्षभरात कृष्णकुंज हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता. राज ठाकरे लोकांना भेटत असल्यामुळे कृष्णकुंजवर गर्दी वाढत होती. तुम्ही कोणालाच भेटत नव्हता, त्यामुळे तुमच्याकडे कोणीही येत नव्हते, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.
नक्की काय म्हणाले होते उद्धव ठाकरे –
अनेकजणांना असं वाटतंय, ये मास्क का लावतोय तू. पण, मास्क न लावण्यात शौर्य काय, मी मास्क वापरणार नाही, मग काय शूर आहेस का? असा प्रश्न विचारत खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. मास्क घालण्यात लाज कसली, मास्क न लावणे यात शूरता नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page