सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण तसे कमी झाले आहे, मात्र, अधूनमधून धमकी, खून, मारामारी अशा घटना घडत असतात. दरम्यान मनसेच्या जिल्हा सचिवास असेच एक निनावी पत्र आले असून त्यामध्ये अज्ञाताने त्यांना ठार मारण्याची धमकीच दिली आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबट अधिक माहिती अशी की, मसनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत निर्णय घेतल्यानंतर त्यांनी जो आदेश दिला तो सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन मनसैनिकांना दिले. त्यानुसार मनसेचे सातारा जिल्ह्याचे सचिव सागर पवार यांच्याकडून मनसैनिकांमार्फत ठाकरे राज यांच्या संदेशाची पत्रके वाटली जात आहेत. या दरम्यान सागर सदाशिव पवार यांना त्यांच्या पिंपरी येथील घरच्या पत्यावर एक निनावी पत्र प्राप्त झाले. यानंतर त्यांनी ते पत्र वाचले असता त्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे दिसून आले.
यानंतर सागर पवार यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात जाऊन धमकीच्या पत्राबाबत सर्व माहिती हि निवेदनाद्वारे दिली. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील राहत्या घराच्या पत्त्यावर काल सातारा पोस्टाद्वारे एक पत्र प्राप्त झाले. त्यामध्ये मला ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असून या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिसांकडून करण्यात यावी, अशी मागणीही पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.