मनसे v/s शिवसेना; मुंबईत कामगार संघटनांच्या सैनिकांत तू तू मैं मैं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वैर, राजकीय मतभेद हे काही वेगळे सांगायची गरज नाही. कारण मनसे v/s शिवसेना वाद हा प्रत्येकाला माहीतच आहे. मुख्य म्हणजे अनेकदा सेना आणि मनसे यांच्यात उघड वाद झालेले आपण पाहिले आहेत. आता पुन्हा एकदा सेना आणि मनसे आमने सामने आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि भारतीय कामगार सेना यांच्यात एक वाद उफाळला आहे. यामुळे पुन्हा एकदा मनसे सेने वादाला नवे कारण मिळाल्याचे दिसले.

त्याचे झाले असे कि, पवई येथील L & T या कंपनीतील कामगारांच्या समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कंपनीत पोहोचली होती. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक, विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आणि रोहन सावंत आपल्या सहकार्यांसमवेत कंपनीत पोहोचले होते. दरम्यान, कामगारांच्या समस्या मांडून मनसेची कामगार सेना कंपनीतून बाहेर पडले असता शिवसेनेच्या कामगारांनी काही कामगारांना एकट्यात पाहून अरेरावी करण्यास सुरवात केली. कामगारांसाठी काम करणाऱ्या शिवसेनेच्या कामगार सेनेने हे असे कृत्य केल्यामुळे मनसे कामगार सेना आक्रमक झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कामगारांना घेऊन पवई पोलिस ठाण्यात पोहोचली आहे.

आत्तापर्यंत कंपनीतील मालकांकडून कामगारांसोबत गैरव्यवहार केला जात होता. पण आता राजकीय पक्षांकडून कामगारांवर असे अत्याचार होत असतील त्याला जबाबदार कोण? असा थेट प्रश्नही उपस्थित केला जात आहे. मनसे आणि शिवसेना आमने सामने येण्याची ही जरी पहिली वेळ नसली तरी कामगारांसाठी ज्या दोन पक्षांतील संघटना काम करत आहेत त्या समोरासमोर आल्यामुळे आता पुढे काय होणार? आणि दोन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठी यावर काही पाऊल उचलणार का? हा वाद मिटणार का आणखी उफाळणार? हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे.