Sunday, April 2, 2023

…तर सगळेच भस्मसात व्हाल; मनसेच्या वर्धापन दिनाचा आला टीझर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ठाकरे व शिंदे यांच्यात सत्तासंघर्षाची लढाई सुरु आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी होताना दिसत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंच्या सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या मराठी राज्यभाषा दिनी मनसेच्या वर्धापन दिनादिवशी आपली भूमिका जाहीर करेन असे सांगितले आहे. येत्या 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन असून या वर्धापन दिनाचा टीझर मनसेकडून लाँच करण्यात आला आहे.

नुकताच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने पनवेलमध्ये झालेल्या जाहीर मुलाखतीमध्ये आपण कोणताही टीझर किंवा ट्रेलर न दाखवता थेट 22 तारखेला गुढी पाडव्याच्या दिवशी सिनेमा दाखवणार असल्याचं म्हटले होते. त्यामुळे राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे गुढी पाडव्याला बोलणार असल्याचे संकेत मिळाले.

- Advertisement -

त्याआधी 9 मार्च रोजी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागले असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वर्धापन दिनाच्या टीझरचा व्हिडीओ आपल्या ट्वीटरवरून शेअर केला आहे. त्यावर “प्रतीक्षा नऊ मार्चची” असेही त्यांनी लिहिले आहे.

काय आहे टीझरमध्ये ?

देशपांडे यांनी ट्विट केलेल्या वर्धापन दिनाच्या टीझरच्या व्हिडीओमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजातील काही वाक्य सुरुवातीला ऐकायला मिळत आहेत. “महाराष्ट्र लढवय्या आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करू नका. शिवरायाचा तिसरा नेत्र उघडला तर सगळेच भस्मसात व्हाल”, असं राज ठाकरे बोलताना दिसत आहेत. त्यासोबतच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हेही त्या टीजरमध्ये दिसत आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंवरही आणखीन जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.