हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MNS- Thackeray Group Alliance । राज्य निवडणूक आयोगाने काल मुंबईसह २९ महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे मुंबईतील मराठी माणसाचे लक्ष्य लागलं आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युतीचा मुहूर्त सांगत मराठी माणसाला सुखद दिलासा दिला आहे. येत्या आठवड्यात युतीची घोषणा व्हायला हरकत नाही. आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी आजच राज ठाकरेंची भेट घेणार आहे अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. आजारी असतानाही निवडणूक जाहीर होताच संजय राऊत आपल्या नेहमीच्या मोडमध्ये ऍक्टिव्ह झाले. निवडणूक लागली असल्याने मला आता तब्बेत सुधारायलाच हवी असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.
युतीच्या घोषणेबाबत राऊत काय म्हणाले? MNS- Thackeray Group Alliance
यंदाची मुंबई महापालिका निवडणूक हि मराठी माणसाची, मराठी अस्मितेची शेवटची लढाई आहे. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, व कोणत्याही परिस्थितीत असो, त्याने या लढाई मध्ये मुंबईला वाचवण्यासाठी उतरायला हवे असं आवाहन संजय राऊत यांनी केलं. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करण्यासाठी पोस्टर्स लागलेत. त्यात कुठल्याही पक्षाचे नाव नाही. सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्रीत हे सर्व पोस्टर काढायला लावले. का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होत आहे. आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि या सरकारच्या लोकांना काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मनसे आणि ठाकरे गटाची युतीची अद्याप घोषणा (MNS- Thackeray Group Alliance) झालेली नाही. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढत आहेत. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शाहांच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की, आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन… या क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत. बाकी इतर महापालिकेमध्ये स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील. ही लढाई 29 महापालिकांपेक्षा मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मुख्य लढाई हे मुंबईचीच होती. आम्ही मराठी लोकं पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत. पण, ही मुंबई आम्ही अमित शाहांच्या घशात जाऊ देणार नाही अशी गर्जना संजय राऊतांनी केली.
काँग्रेसवर निशाणा –
यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेस या क्षणी आमच्या सोबत आहे, असे मला दिसत नाही. बिहारच्या निकालानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यांनी आमच्या सोबत मुंबईच्या लढाईत असायला हवे होते, ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांची देखील बोललेलो आहे. पण, त्यांनी ती बाब नेहमीप्रमाणे स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचे आवाहन कायम असेल की, तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका मुंबईच्या लढाईत घेऊ नये. लोक हे विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील येणार आहे ते लक्षात घ्या असा इशारा संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला.




