सोलापूर प्रतिनिधी। राज्यासह देशभरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावत असतात. त्यामुळे मंदिरात कायमच मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. परंतु आता या भाविकांसाठी पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षापासून म्हणजेच १ जानेवारी २०२० पासून हा नियम लागू होणार आहे.
मोबाईल बंदी बरोबरच लाऊड स्पिकरला ही बंदी घालण्यात आली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीच्या वतीने अल्पदरात मोबाईल लाॅकरची सोय देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याने, या निर्णयाचे भाविकांमधून देखील स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान याआधी राज्यातील शिर्डी देवस्थानामध्ये देखील मोबाईल नेण्यास बंदी आहे. त्याच पार्शवभूमीवरहानिर्णय घेण्यात आला असून, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी देखील मंदिरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांकडून मोबाईल फोन नेण्यासाठी मज्जाव करण्यात येत होता. मात्र, आता समितीनेच तसा निर्णय जारी केला आहे.