तासगावात खासदारांच्या कार्यालयाबाहेर ‘मोदी माफी मागो’ आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महाराष्ट्राने कोरोना पसरवला असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगत महाराष्ट्राचा अपमान केलाय. यावेळी उपस्थित असणाऱ्या खासदार संजय काकांनी स्वाभिमान असेल राजीनामा देत महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही हे कृतीतून दाखवावे असे आव्हान कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी दिले. तासगावात नरेंद्र मोदी माफी मागो या आंदोलनात ते बोलत होते.

खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास आमदार विक्रम सावंत यांच्यासह जिल्ह्यातील नेतेमंडळी उपस्थित होती. तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी याचे आयोजन केले. यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील म्हणाले पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्राचा अपमान करत असताना संजयकाका शांतपणे कसे बसू शकतात. स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा दयावा.

उत्तरप्रदेश सह पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पंतप्रधान महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. कोरोना काळात तुम्ही नमस्ते ट्रम्प कार्यक्रम करून देशाला कोरोनाच्या खाईत लोटलं. पण महाराष्ट्राने प्रत्येक राज्यातील माणसांना त्यांच्या घरापर्यंत व्यवस्थित पोहचवले. तरी तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करता आणि आमचे खासदार ते ऐकून घेतात. वसंतदादांनी पक्षाध्यक्ष यांच्याशी न पटल्याने राजीनामा दिला होता. तुम्ही आता लाखाची प्रॉपर्टी हजार कोटींच्या घरात आणली आता तरी स्वाभिमान दाखवा असे आव्हान दिले.