हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला लगावला आहे. अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनवरून विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज आहे असे शरद पवार यांनी म्हंटल. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. आज ही हजारो मुलं अडकलीयत. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात येतात. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अशा वेळी अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी येण्यापेक्षा युक्रेनवरून विद्यार्थ्यांना परत आणण्याची अधिक गरज आहे असे पवारांनी म्हंटल.
शरद पवार पुढे म्हणाले, जसे पुणे शिक्षणाचं माहेर घर आहे. तसं युक्रेन शिक्षणाचं माहेरघर ओळखलं जातं.म्हणून विद्यार्थी जातात. मात्र सध्या सुरु असलेल्या संकटामुळे स्थानिकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. युक्रेनविरोधात रशियाने सुरु केलेल्या हल्ल्यांबाबत भारताने तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे युक्रेनी नागरिक भारतीयांवर नाराज आहेत, मात्र अशा परिस्थितीत याआधीही देशाने कायम तटस्थ भूमिकाच घेतली.त्यामुळे भारत सरकारच्या याबाबत घेण्यात आलेल्या भूमिकेबाबत टिका टिपणी करण्याची ही वेळ नाही असेही पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचाही समाचार घेतला. महाराष्ट्राला कर्तृत्ववान राज्यपालांचा वारसा लाभला आहे. त्यामुळे कोशारी यांच्याबाबत न बोललेलेच बरं असा टोला त्यांनी लगावला.