हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 71 वा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आजचा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन विरोधकांनी केलं होतं. त्याचा परिणाम आज म्हणजेच मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिसून येत असून #राष्ट्रीयबेरोजगारदिवस या हॅशटॅगवर दीड लाखांच्या आसपास ट्विट सकाळी आठ वाजेपर्यंत करण्यात आले आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून २१ दिवसांचं सेवा आणि समर्पण अभियान सुरु करण्यात आलं असून त्यालाच विरोध करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलीय.
राष्ट्रीयबेरोजगारदिवस टॅग वापरून ‘दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत?’ असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. तरुणांसोबत अनेक नेतेही यात सहभागी झाले आहेत. बेरोजगारी वाढल्याने लाखो तरुणांवरील ताण वाढलाय. इंडियन युथ काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणार आहे,” अशी घोषणा युथ काँग्रेसने केलीय.
करोना काळावधीमध्ये ३२ लाख पगारी व्यक्तींनी रोजगार गमावला असून मोदींचे श्रीमंत मित्र अधिक श्रीमंत होत आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. “पकोडानॉमिक्स पुरे झालं आता येथील तरुणांना खरोखर नोकऱ्यांची गरज आहे,” असा टोलाही युथ काँग्रेसने लगावला आहे.