हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्ञानवापीच्या मशिदीवरील प्रकरणावरून सध्या हिंदू व मुस्लिम यांच्याकडून दावे केले जात आहेत. अशात आता ज्ञानवापी प्रकरणी सरसंघचालक मोहन भगवंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ज्ञानवापी हा श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. तसेच प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही, अशी भूमिका भागवत यांनी मांडली आहे.
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष अधिकारी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, “उगीचच कशासाठी वाद निर्माण करायचा? प्रत्येक मशिदीत शिवलिंगचा शोध कशासाठी घ्यायचा?. वास्तविक पाहता ऐतिहासिक कारणांमुळे रामजन्मभूमी मोहिमेत सहभागी झालो आणि ते पूर्ण केले असल्याचे 9 नोव्हेंबरला आम्ही सांगितले होते.
देशभरात सध्या एकच मुद्दा गाजत आहे तो म्हणजे सध्या ज्ञानवापीचा. आपण प्रत्येकजण काहीही केले तरी इतिहास बदलू शकत नाही. आपण तो इतिहास लिहिलेला नाही, ना सध्याच्या हिंदूंनी, ना मुस्लिमांनी. हे सर्व भुतकाळात झाले आहे. त्यामुळे जेव्हा भारतीयांचे मनोधैर्य खच्ची करण्याच्या हेतूने इस्लाम आला तेव्हा हजारो मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, असे भागवत यांनी म्हंटले.