मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना मंत्री मंडळात स्थान दिले जाईल असे बोलले जात होते. मात्र त्यांना कोणत्या प्रकारे मंत्री मंडळात समाविष्ट करून घेतले नाही. त्यामुळे भाजपने मोहिते पाटील घराण्याला एक प्रकारे श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात पाहण्यास मिळते आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जोडीला विजयसिंह मोहिते पाटील यांना देखील कॅबेनेट मंत्री बनवले जाणार अशा चर्चा होत्या. मात्र त्या चर्चा सत्यात उतरू शकल्या नाहीत हे आजच्या मंत्री मंडळ विस्ताराला वरून दिसून आले आहे.
ज्या मोहिते पाटील घराण्या शिवाय महाराष्ट्राचे राजकारण पूर्णच होत नाही. ते मोहिते पाटील घराणे आमच्या सोबत आहे असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून मोहिते पाटील घराण्याच्या ऐवजी फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील व्यक्तीला संधी दिली त्यामुळे त्यावेळी देखील मोहिते पाटील घराण्याला भाजप सुद्धा शह देते आहे का अशा चर्चा होऊ लागल्या. मात्र मोहिते पाटील परिवाराने स्वतःची शक्ती पणाला लावून माढ्याची जागा भाजपच्या नावावर करून दिली.
लोकसभा निवडणुकीच्या काळात चंद्रकांत पाटील अकलूजला मोहिते पाटील यांच्या निवासस्थळी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी आले असता. मोहिते पाटील घराण्यातील विजयसिंह आणि रणजितसिंह या दोघांना हि मंत्री करण्याचा आमचा उद्देश आहे असे म्हणले होते. परंतु आता चंद्रकांत पाटील यांचे विधान सुद्धा सत्यात उतरलेले दिसत नाही. तर मोहिते पाटील यांचा मंत्री मंडळात समावेश येत्या विधान सभा निवडणुकी नंतरच केला जाईल असे बोलले जाते आहे. तरी देखील या बाबत खात्रीलायक काहीच माहिती अद्याप समोर आली नाही. म्हणून नारायण राणे यांच्या प्रमाणे मोहिते पाटील घराण्याचे करू नये इतकीच मोहिते पाटलांच्या समर्थकांची अपेक्षा आहे.