औरंगाबाद – तडीपार असताना ठाण्याच्या हद्दीत येऊन विनयभंगाचा गुन्हा करणाऱ्या सराईत आरोपीला वेदांत्नगर पोलिसांनी तत्काळ अटक केली. विशेष म्हणजे त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करत 72 तासात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सध्या आरोपी हर्सूल कारागृहात असून, मंगेश मारुती भालेराव (रा. राजीवनगर, रेल्वेस्टेशन) असे आरोपीचे नाव आहे.
वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश भालेराव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेले आहे. या कालावधीतही तो पोलिस ठाण्याच्या हद्दीत येऊन गुन्हे करीत आहे. 5 फेब्रुवारीला पीडितेच्या घरात घुसून आरोपीने महिलेचा विनयभंग केला होता. त्यावरून 6 फेब्रुवारीला वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे यांनी आरोपी मंगेश भालेराव याला तात्काळ अटक केली. त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा केले. विशेष म्हणजे पुराव्यासहित यांच्याविरुद्ध 72 तासात दोषारोपपत्र देखील सादर केले. न्यायालयाने याबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे.
आरोपीविरुद्ध 12 गुन्हे –
आरोपी मंगेश भालेराव हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मारामारी करणे, विनयभंग, मालाविरुद्धचे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. क्रांती चौक आणि वेदांत नगर पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत. त्याला 6 मार्च 2021 रोजी दोन वर्षांसाठी तडीपार केलेले आहे.