खुशखबर! मान्सून ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । यंदा उन्हाच्या प्रकोपामुळे रेकॉर्ड ब्रेक तापमान महाराष्ट्रातील काही भागात नोंदवले गेले आहे. विशेषकरून विदर्भांत पारा ४७ अंशांच्या पार पोहोचला आहे. अशा वेळी लोकांना लवकरच या उष्ण वातावरणापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने IMD वर्तवला आहे. त्यापूर्वी ३० मेपासून राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसायला सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्यातील शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली. त्यामुळे प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

हवामान खात्याने गुरुवारीच मान्सून १ जूनला केरळात दाखल होईल, असे म्हटले होते. अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असणारा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल विनासायास होईल, असे IMD ने म्हटले होते. दरम्यान मालदीव-कोमोरिन परिसरात मान्सूनच्या पावसाला सुरुवातही झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागराचा परिसर व अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरातही काही प्रमाणात मान्सूनच्या सरी बरसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. साधारण साडे चार महिने पडणारा पाऊस शेतीसाठी लागणाऱ्या ७० टक्के पाण्याची गरज पूर्ण करतो. अशातच यंदा राज्यावर कोरोनासारखे भीषण संकट ओढावले आहे. त्यामुळे राज्यात समाधानकारक पाऊस पडल्यास अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. भारताची अर्थव्यवस्था ही आशिया खंडातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. हवामान खात्याने यापूर्वी वर्तविलेल्या अंदाजानुसार, यंदाचे पर्जन्यमान १०० टक्के असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”