भंडारा । मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आज मुंबईतील आझाद मैदानात शेतकरी मोर्चा पार पडला. या मोर्चाला पाठिंबा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. मात्र, या मोर्चावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे.
मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्षांनी आदिवासींची दिशाभूल करुन केवळ ढोंगबाजी करत आहेत असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भंडाऱ्यातील रुग्णालयातील दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपच्या वतीने आज भंडाऱ्यात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारला राज्यातील सामन्य जनतेची काहीच पडलेली नाही. केवळ बिल्डरांसाठी हे सरकार काम करत असल्याचाही आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. “केवळ माल कमवणे हीच या सरकारची सर्वात मोठी योजना आहे. धान खरेदीतही मोठा घोटाळा झाला आहे”, असा आरोपही फडणवीस म्हणाले. वीज बिल माफीवरूनही फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीला धारेवर धरले.
“राज्यातील सामान्य जनतेला आलेलं वाढीव वीजबिल माफीची घोषणा उर्जामंत्र्यांनी केली होती. त्यानंतर सरकारनं थेट घुमजाव केलं. अशाप्रकारचा ढोंगबाजी करणारं सरकार आजवर पाहिलेलं नाही. ठाकरे सरकार हे बेईमान सरकार आहे. या सरकारविरोधात लढा अशाच पद्धतीने यापुढील काळतही सुरूच राहील. दिलेला शब्द न पाळलेल्या ऊर्जामंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही”, असं फडणवीस म्हणाले.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’