हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना स्मृतिभ्रंश (Dementia) होण्याची शक्यता आहे. संशोधनानुसार, देशातील जवळपास 1.008 करोडहून अधिक वृद्धांना स्मृतिभ्रंश होऊ शकतो. हे संशोधन एम्ससह जगभरातील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांनी केले आहे. आकडेवारी नुसार, वृद्धांना स्मृतिभ्रंश होण्याचे हे प्रमाण अमेरिका आणि ब्रिटन प्रमाणेच असू शकते.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, स्मृतिभ्रंश हा वृद्धत्वाशी संबंधित विकार आहे. स्मृतिभ्रंश हा व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर परिणाम करतो जसे की स्मरणशक्ती कमी होणे, विचार करण्याची, तर्क करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे. त्यामुळे व्यक्ती रोजची कामेही करू शकत नाही. या आजारामुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत होते.
संशोधकांना असे आढळून आले की भारतात 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण 8.44 टक्के इतके असू शकते. म्हणजे देशात आत्ता जेवढे वृद्ध व्यक्ती आहेत त्यामधील जवळपास 1.008 करोड वृद्धांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत हाच दर 8.8 टक्के, यूकेमध्ये 9 टक्के आणि जर्मनी- फ्रान्समध्ये 8.5 ते 9 टक्के आहे.
स्मृतिभ्रंशाचा सर्वाधिक धोका वृद्ध, महिला, अशिक्षित आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांना असल्याचे संशोधकांना आढळून आले. आमचे संशोधन हे भारतातील पहिले आणि एकमेव राष्ट्रीय स्तरावरील संशोधन होते, ज्यामध्ये देशातील 30,000 पेक्षा जास्त वृद्धांचा समावेश होता, असे यूके विद्यापीठातील हाओमियाओ जिन यांनी सांगितले. स्थानिकरित्या गोळा केलेल्या डेटामध्ये AI अधिक अचूकपणे स्मृतिभ्रंशाचे प्रमाण सांगू शकते.
दरम्यान, युनिव्हर्सिटी ऑफ सरे, युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन आणि AIIMS नवी दिल्ली यांच्या संशोधन पथकाने AI लर्निंग मॉडेल विकसित करून हा निष्कर्ष काढला आहे.