कोरोनाची दुसरी लाट भीतीदायक! भारतात मागील 24 तासात 2.5 लाखाहून आधीक नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत धक्कादायक रित्या रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. मागील 24 तासात देशात 2लाख 59 हजार 170 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली आहे. तर मागील 24 तासात 1,761 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

नव्याने आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे आतापर्यंत देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1कोटी 53 लाख 21 हजार 89 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे एकूण 1 लाख 80 हजार पाचशे तीस व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधला मृत्युदर देखील सर्वाधिक असल्याचं आढळून येत आहे.

दरम्यान मागील 24 तासात एक लाख 54 हजार 761 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 1कोटी 31 लाख 8 हजार 582 झाली आहे. देशात सध्या 20 लाख 31 हजार 970 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि कोरोना महामारीपासून पासून रक्षण करण्यासाठी देशात लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 1 मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार असल्याचं सांगितले आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये 18 वर्षावरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत देशात 12 कोटी 71 लाख 29 हजार 113 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

You might also like