हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाचे 3095 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 1390 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. सध्या भारतात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 2.61% वर गेला आहे. त्याच वेळी रिकव्हरी रेट 98.78% आहे. मात्र अचानक रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता वाढली आहे.
देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 4,47,15,786 झाली आहे. त्याच वेळी, सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 15,208 वर पोहोचली आहे. रुग्णाच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक भीषण परिस्थिती महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक आणि दिल्लीत आहे. सध्या दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 900 च्या वर गेली आहे, तर केरळमध्ये 4000 च्या वर गेली आहे. महाराष्ट्रातही सक्रिय रुग्णांची संख्या 3090 वर तर गुजरातमध्ये 2310 ऍक्टिव्ह केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. याशिवाय हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये, तामिळनाडू, हरियाणा, गोवा मधेही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.
गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दिल्ली, कर्नाटक, पंजाबमध्ये प्रत्येकी दोन मृत्यूची नोंद झाली आहे. गुजरातमध्ये एक मृत्यू झाला आहे, तर केरळमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू पुन्हा एकदा फोफावताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेच आहे तसेच केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे. त्यानुसार गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.