सकलेन मुलाणी । कराड
कराड । पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आज कोरोनामुक्तीचे तिसरे सहस्त्रक पूर्ण झाले. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 2 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा 3000 पार झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा मोठा कहर झाला आहे. मोठ्या संख्येने कोरोना बाधित रूग्ण वाढत असतानाच कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीसाठी दिलेले योगदान अभूतपूर्व ठरत आहे. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू झालेल्या उपचारांमुळे 18 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगरानीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत, आज कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे तिसरे सहस्त्रक पूर्ण केले.
आज 2 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्जार्च देण्यात आला. कोरोनामुक्तीची ही लढाई जिंकलेल्या रूग्णांचा सत्कार कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. विश्वास पाटील, रोहिणी बाबर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की एक काळ असा होता की कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे ५०० हून अधिक पेशंट असायचे. पण सुदैवाने आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. लोकांनी लशीची वाट पाहण्यापेक्षा आणि दुसऱ्या लाटेची भिती बाळगण्याऐवजी स्वत:च्या काळजीकडे अधिक लक्ष द्यावे. तसेच मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरच्या वापराकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये आगाशिवनगर येथील 70 वर्षीय पुरूष व धावरवाडी येथील 60 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’