Sunday, April 2, 2023

हृदयद्रावक ! धावत्या रेल्वेतून पडून मायलेकाचा दुर्दैवी अंत

- Advertisement -

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मायलेकाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत झाला आहे. हे दोघेजण रात्रीच्या रेल्वेने नागपूरहून रेवा या ठिकाणी येत होते. यादरम्यान देव्हाडा माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी रेल्वेचे कर्मचाऱ्यांना मायलेकाचा मृतदेह सापडल्यानंतर हि धक्कादायक घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि करडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पूजा इशांत रामटेके असं मृत पावलेल्या 27 वर्षीय महिलेचं नाव आहे. तर अथर्व इशांत रामटेके असं दीड वर्षाच्या मृत चिमुकल्याचं नाव आहे. इशांत रामटेके हे लष्करात जवान आहेत. ते गेले काही दिवस सुट्टीवर आले होते. सुट्टी संपल्यानंतर ते पुन्हा नागपूरहून आपल्या कुटुंबीयांसह रेवा या ठिकाणी जात होते. हे कुटुंब रात्रीच्या सुमारास रेल्वेने प्रवास करत होते.

- Advertisement -

काय घडले नेमके ?
इशांत यांची पत्नी पूजा यांना लघुशंका लागल्याने त्या आपल्या पतीला सांगून डब्यातील प्रसाधनगृहाकडे गेल्या होत्या. यावेळी दीड वर्षांचा अथर्व आईच्या पुढे धावत गेला. काही कळायच्या आतच तो तोल जाऊन माडगी व देव्हाड दरम्यान असलेल्या वैनगंगा नदीवरील रेल्वेपुलावरून नदीत पडला. यावेळी अथर्वच्या पाठीमागे आलेल्या पूजा यांनी चिमुकल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये त्यांचादेखील तोल जाऊन त्या धावत्या रेल्वेतून खाली पडल्या. या दुर्घटनेत दीड वर्षाच्या अथर्वचा नदीच्या पाण्यात बुडून तर आईचा पुलावरील खांबाला धडकुन मृत्यू झाला आहे.

ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याने कोणालाच या घटनेचा पत्ता लागला नाही. बराच वेळ होऊनही पत्नी आणि मुलगा परत आले नाहीत, म्हणून सैनिक इशांत रामटेके यांनी धावत्या रेल्वेत पत्नी आणि मुलाची सगळीकडे शोधाशोध केली. पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. यानंतर इशांत यांनी गोंदिया पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता वैनगंगा नदीत मुलाचा तर रेल्वे पुलावर महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.