नेर : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ जिल्ह्यातील नेर याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दहावीत शिकणारी मुलगी घरातून अचानक निघून गेल्यानंतर मुलीच्या आईने तिच्या विरहात आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर घरी आलेल्या आईने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दहावीत शिकणारी मुलगी अशाप्रकारे घरातून निघून गेल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या नेर येथील रहिवासी असणारी 40 वर्षीय महिला एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. घटनेच्या दिवशी या महिलेची मुलगी दहावीची परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली होती.मात्र हि परीक्षा दिल्यानंतर ती परत घरी आलीच नाही. बराच वेळ वाट पाहूनही मुलगी घरी न आल्याने मुलीच्या आईने नेर पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून बाभूळगाव येथील 17 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल केल्यानंतर पीडित महिला आपल्या घरी आली. यावेळी घरी कोणीच नव्हते. त्यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी कुणीही नसल्याचं पाहून 40 वर्षीय महिलेनं आपल्या राहत्या घरात साडीने गळफास लावून आपल्या आयुष्यचा शेवट केला. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस सध्या घरातून निघून गेलेल्या मुलीचा शोध घेत आहेत.