एकरकमी FRPसाठी आगामी ऊस गळीत हंगामात जूनपासून आंदोलन : राजू शेट्टी

Raju Shetty
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आगामी ऊस गाळप हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकही कारखाना सुरू होवू देणार नाही. जून महिन्यापासूनच एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरू केले जाईल. कारखानदारांनी दोन तुकड्यात एफआरपी जाहीर करून कारखाना सुरू करून दाखवावेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजू शेट्टी म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीत किमान समान कार्यक्रमाच्या मुद्यावरून गेलो होतो. मात्र, काही फरक पडत नसल्याने आम्ही बाहेर पडलो. राज्य सरकारने एकरकमी एफआरपी देणे गरजेचे होते. केंद्राने केलेले कायदे रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसतो.

आज सर्व गोष्टीचे भाव गगनाला भिडले आहेत. रासायनिक खते, डिझेल, आणि खते- आैषधे यावर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. भाववाढीमुळे 214 रूपयांनी टनामागे खर्च वाढला आहे. साखर कारखान्यांना 7 ते 8 महिने साखर साठवून ठेवल्याने त्यावरील व्याज देणे परवडत नसल्याचे म्हणतात. परंतु 20 ते 21 महिने ऊस शेतकरी शेतात उभा ठेवतो, तेव्हा त्याचाही विचार करून एकरकमी एफआरपी कारखान्यांनी दिली पाहिजे. आगामी येणाऱ्या हंगामात एकरकमी एफआरपी न देता कारखाने सुरू करून दाखवावेत, असा इशारा राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिला आहे.