औरंगाबाद – धुळे-सोलापूर महामार्गावर तीन दरोडेखोरानी शुक्रवारी मध्यरात्री अक्षरशः धुमाकूळ घातला. रायपूर डोंनगाव येथून एक क्विड चारचाकी थांबवून तिघे ती घेऊन पळाले व तीच चोरीची कार बँकेच्या चेअरमनच्या धावत्या इनोव्हा समोर लावून बेदम मारहाण करीत ती घेऊन पळाले. दरम्यान दरोडेखोरांचा वाहनांचा जांभळा जवळ भीषण अपघात झाला. या मध्ये एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर तिघे आरोपी जखमी झाले.पोलिसांनी त्यांना अटक केली.
देवेंद्र विठ्ठल शिंदे, योगेश राजदेव, उमेश कारभारी अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. तर चंद्रकांत वसंतराव बोडखे असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी चालकांचे नाव आहे. सतीश गुप्ता असे जखमी बँकेच्या चेअरमनचे नाव आहे.
या धक्कादायक घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास एम.एच.20 डी. व्ही.4245 हा वाहनातून चालक कन्नड येथील कार्यक्रम आटोपून औरंगाबादच्या दिशेने येत असताना रायपूर डोंनगाव जवळ दरोडेखोरांनी वाहन थांबविले. काही समजण्याच्या आतच तिघांनी चालकांवर हल्ला चढवीत कार पळविली आणि पसार झाले.त्यानंतर याच रस्त्याने ते औरंगाबादच्या दिशेने गेले.दरम्यान चिखली अर्बन बँकेचे चेअरमन, बँकेचा अधिकारी आणि चालक हे त्यांच्या इनोव्हा कार ने जात होते. त्याचवेळी दरोडेखोरांनी एखाद्या चित्रपटातील घटनेप्रमाणे महामार्गावर गुप्ता यांच्या इनोव्हाला ओव्हरटेक करून त्यांच्या समोर कार आडवी लावली. आणि काही क्षणांतच तिन्ही दरोडेखोरांनी इनोव्हाचा दरवाज्याच्या काचा फोडल्या.गाडीतील चेअरमन ,बँक अधिकारी आणि चालकाला बाहेर काढून बेदम मारहाण केली. रायपूर डोंनगाव फाट्यावरून चोरलेली क्विड कार सोडून इनोव्हा कार घेऊन दरोडेखोर पसार झाले. मात्र काही किलोमीटर अंतरावर जाताच धुळे-सोलापूर महामार्गावरील वरझडी फाटा येथे दरोडेखोरांचा वाहनाने दुचाकीस्वार बोडखे यांना चिरडले. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने इनोव्हाचा देखील अपघात झाला. या भीषण अपघातात बोडखे जागीच ठार झाले. तर तिघे दरोडेखोर जखमी झाले.
तेथून पाळण्याचा प्रयत्न करीत असताना दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांना या बाबत माहिती मिळाली तसेच गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांच्या पथकाने संयुक्तिक कारवाई करीत दरोडेखोरांचा मुसक्या आवळल्या. तिन्ही दरोडेखोर अपघातात जखमी झाल्याने त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर जखमी गुप्ता आणि त्यांचा सहकारी, चालकांवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती निरीक्षक रवी खांडेकर यांनी दिली आहे. तर अपघात मृत्यू प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे निरीक्षक राजश्री आडे यांनी सांगितले.