फलटण | ‘कृष्णा खोऱ्यामध्ये आम्ही लवादाच्या कचाट्यातून पाणी अडविण्याचे काम वेळेत केल्याने तब्बल 81 टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यात मिळाले आहे. नीरा-देवघर धरणाचे काम आम्हीच पूर्ण केले. खंडाळा तालुक्यापर्यंत कालव्याद्वारे याचे पाणी आम्ही आणले. माझे कष्ट महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. पाठपुरावा आम्ही केला. आम्ही पाणी अडवून धरणे बांधली, पुनर्वसन केले, कामे सुरू केली, सर्व काय आम्ही शिजवलं आणि याला फोडणी द्यायचं काम विरोधक करीत आहेत. रणजितसिंह जलनायक नसून खलनायक आहेत,’ असा घणाघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केला.
सध्या नीरा- देवघरच्या पाण्यावरून फलटण व माढा लोकसभा मतदार संघात जोरदार रणकंदन माजले आहे. त्या पार्श्वभूमीवर फलटण येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘कृष्णा खोऱ्यामध्ये आम्ही लवादाच्या कचाट्यातून पाणी अडविण्याचे काम वेळेत केल्याने तब्बल 81 टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यात मिळाले आहे. नीरा-देवघर धरणाचे काम आम्हीच पूर्ण केले. खंडाळा तालुक्यापर्यंत कालव्याद्वारे याचे पाणी आम्ही आणले. पुढील काम पूर्ण होईपर्यंत 55 टक्के पाणी बारामतीला आणि 45 टक्के पाणी फलटणला मिळत होते. आपल्या तालुक्याला हे पाणी पुरत असताना यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न खासदारांनी केला. खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह आणि आमदार जयकुमार गोरे यांनी बारामतीला जाणाऱ्या पाण्याला विरोध करून पूर्वीचा जीआर बदलायला लावला. यामुळे नीरा- देवघरचे पाणी आपल्या तालुक्याला मिळणार नाही, त्यांची ही मोठी चूक आहे.
नीरा-देवघर क्षेत्रात भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस हे तालुके आहेत. या तालुक्यांची तहान भागून इतर तालुक्याला पाणी देण्यास आपला कसलाही विरोध नाही. आता नीरा-देवघरच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी खासदारांच्या चुकीमुळे याचे पाणी फलटण तालुक्याला न मिळता माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्यांना मिळणार आहे. मोठ्या कष्टाने नीरा-देवघरचे जे धरण आम्ही तालुक्यासाठी बांधले, त्या तालुक्याला पाणी मिळत नसेल तर काहीच अर्थ राहणार नाही. सांगोल्याला पाणी देण्यास माझा विरोध नाही; मात्र फलटणची तहान भागून उरलेले पाणी त्यांना दिले तर हरकत नाही, या मताचा मी आहे. सांगोला तालुक्याचा दुष्काळ मिटावा म्हणून मी टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे काम पूर्ण करून सांगोला तालुक्याला पाणी दिलेले आहे. हे तेथील जनतेने विसरू नये, असेही आ. रामराजे नाईक- निंबाळकर यांनी सांगितले.’