Sunday, March 26, 2023

एकनाथ शिंदेंचा गौतम अदानी झालाय, त्यांनी आता..; सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अवस्था गौतम अदानी यांच्यासारखी झाली आहे. ज्याप्रमाणे अदानींच्या कंपन्यांचे शेअर्स दणादण कोसळत आहेत. त्यांची फुगवलेली श्रीमंती जागतिक यादीतून हद्दपार झाली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांची गत झाली आहे. मुख्यमंत्री फक्त खुर्चीवर आहेत व कारभाराची सूत्रे दिल्लीतून हलत आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाकडून सामनातील अग्रलेखातून करण्यात आला आहे.

आजच्या सामनातील मुखपत्रात शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आलेला आहे. विरोधक चहापानाला आले नाहीत ते बरे झाले. त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले, ज्यांनी देशद्रोह केला, त्यांच्यासोबत चहा पिणे टळले, ते बरे झाले, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. त्यावर ‘सामना’तून सडकून टीका करण्यात आली आहे. विरोधकांना देशद्रोही ठरवणे ही भाजपची परंपरा आहे.

- Advertisement -

मिंधे गटाच्या आमदारांनी आणि त्यांच्या मुख्य नेत्याने भाजपचा बाप्तिस्मा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा अभ्यास कच्चा आहे व ते ज्यांच्या सावलीत वावरत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वकिलीची डिग्री असली तरी ते महाराष्ट्रद्रोह्यांची वकिली करण्यात धन्यता मानतात. महाराष्ट्राला लाचार करण्याचे प्रयत्न दिल्लीतून सुरु आहेत.

फडणवीस-महाजनांना कोण हात लावणार?

देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना जेलमध्ये पाठविण्याची योजना होती, असा भिजका लवंगी ‘स्फोट’ मुख्यमंत्र्यांनी करून लाचारीचे टोकच गाठले. वास्तविक ‘ईडी,सीबीआय’ कडून चौकश्या व अटकेचे भय होते. अटकेच्या सुपाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा घेत आहेत व देशभरातील विरोधकांना अटक केली जात आहे. त्या यंत्रणांचे मालक दिल्लीत बसले असताना फडणवीस- महाजनांना कोण हात लावणार? उलट महाराष्ट्रात याआधी असलेल्या महाविकास आघाडी सरकारने ‘विक्रांत’ घोटाळयापासून अनेक भ्रष्ट प्रकरणांच्या चौकश्या लावल्या. सत्तांतर होताच या सगळया भ्रष्टाचाऱ्यांना ‘क्लीन चिट देऊन मोठीच देशसेवा फडणवीस शिंदे सरकारने केली, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फक्त खुर्चीवर, खरा तर मालक…

मुख्यमंत्री शिंदे यांचा सपशेल गौतमभाई अदानीच झाला आहे. अदानी कंपन्यांचे शेअर्स दणादण कोसळत आहेत. त्यांची फुगवलेली श्रीमंती जागतिक यादीतून हद्दपार झाली. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देशातील पहिल्या दहाच्या यादीतही नाहीत. कारण मुख्यमंत्री फक्त खुर्चीवर आहेत व कारभारी दिल्लीतून सूत्रे हलवीत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे’, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांना लगावण्यात आला आहे.