मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रपती नियुक्त खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी आपला ५ कोटींचा खासदार निधी पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे. खासदार संभाजीराजे भोसले यांनी स्वतः ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. मी माझा खासदारकीचा ५ कोटी निधी पूर्णपणे पूरग्रस्तांसाठी खर्च करत आहे. मला माहित आहे हा निधी अत्यंत कमी आहे मात्र ही एक सुरुवात आहे असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हणले आहे.
संभाजीराजेंनी स्वतः पाण्यात उतरून पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी मदत केली आहे. त्याच प्रमाणे बोटींची नेआण करण्यात सुद्धा त्यांनी मदत केली आहे. आपण राजे आहोत याचा थोडाही गर्व त्यांनी मनात नठेवता पूरग्रस्तांना मदत केली आहे. परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून प्रशासनाला कामाला लावण्याचे मोठे काम संभाजीराजेंनी केले आहे.
दरम्यान कोल्हापूर आणि सांगलीची पूरस्थिती आद्यप देखील कायम आहे. तेथील जनजीवन अद्याप देखील विस्कळीत आहे. मात्र पूर पातळीत घट झाल्याने स्थिती काही दिवसात सुधारेल असे अंदाज बांधले जात आहेत. त्याच प्रमाणे बंगलोर महामार्गावरील वाहतूक अंशतः सुरु झाली आहे.