हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पी एम किसान ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माध्यमातून केंद्र शासनाकडून मिळणारा निधी समन्यायी व योग्य पद्धतीने वापरणारा जिल्हा अशी सातारा जिल्ह्याची ओळख व्हावी म्हणून सर्वांनी काम करावे, शासकीय अधिकाऱ्यांनी देखील पी.एम. किसान योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा, असे प्रतिपादन साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खा. श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, समितीचे अशासकीय सदस्य सर्वश्री सुरेशचंद्र काळे, किरण साबळे, सतेश कांबळे, बाळकृष्ण ननावरे, ॲड्. विनीत पाटील, अजय माने, मारुती मोळावडे, विश्वासराव भोसले, श्रीमती निलम ऐडगे, संगिता साळुंखे, समिद्रा जाधव आदींसह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्रीनिवास पाटील म्हणाले, अशासकीय सदस्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकी घ्याव्यात आणि त्यातून प्रश्न मार्गी लावावेत. जर समस्या सोडवण्याविषयी काही अडचणी असल्यास त्या आमच्याकडे द्याव्यात आम्ही केंद्रीय पातळीवर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. शाळा, पाणी पुरवठा योजना तसेच कृषि पंपांसाठी विद्युत पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी सौर पॅनेल बसवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. तसेच नागरिकांनीही घरातील सोहळ्यांच्या निमित्ताने एखादा सौर पॅनेल शाळा, पाणी पुरवठा यंत्रणा यांना दिल्यास विजेचा प्रश्न मार्गी लागेल.