मुंबईची पाणीवाली बाई असं मृणाल गोरे यांना का म्हटलं जायचं? आमदार, खासदार अन..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्वातंत्रदिन विशेष । मृणाल गोरे या महाराष्ट्रातील एक महत्त्वाच्या राजकीय नेत्या होत्या. पुरुषांचा राजकारणात दबदबा असणाऱ्या काळात त्यांचं नेतेपण विशेष उठून दिसायचं. त्यांचा जन्म २४ जून १९२८ सालचा. या भारतातील समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले. या महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. तसेच सहाव्या लोकसभेत या खासदार होत्या. मृणाल गोरे यांनी राष्ट्र सेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या. मुंबईच्या गोरेगाव उपनगरात त्या पाणीवाली बाई म्हणून प्रसिद्ध होत्या. (Mrunal Gore information in marathi)

जनसामान्यांच्या प्रश्नाबद्दल कमालीची आस्था असलेल्या कार्यकर्त्यापासून ते समाजवादी नेत्या इथपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास आहे. स्थानिक महिला मंडळाच्या माध्यमातून समाजकार्याला सुरुवात करणाऱ्या मृणालताईंच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी कायम सामान्य माणूस होता. त्यातही महिला, शिक्षण आणि सक्षमीकरण हा त्यांच्या कार्याचा गाभा होता. महिला मंडळात आरोग्य, आहार, कुटुंबनियोजन यांसारख्या साध्या साध्या विषयांवरील चर्चा, जागरुकता कार्यक्रमांपासून ते सर्वांना पाणी मिळण्यासाठी त्यांनी छेडलेली असंख्य आंदोलने वा महागाईविरोधी मोर्चा इथपर्यंत त्यांच्या सर्वच संघर्षांमध्ये महिलांच्या प्रश्नांची आणि या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महिलांचेच बळ मोलाचे ठरेल, याबाबतची त्यांची जाण अचूक होती.

उत्तर मुंबईच्या परिसरातील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याच्या समस्या सोडवताना एकीकडे रहिवाशांचे संघटन करणाऱ्या कार्यकर्त्या आणि दुसरीकडे सरकारी अधिकाऱ्यांकडे अभ्यासू पाठपुरावा करणाऱ्या त्या नेत्या होत्या. सर्वांना पाणी मिळालेच पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी केलेल्या संघर्षाची परिणती म्हणून ‘पाणीवाली बाई’ ही उपाधी सर्वसामान्यांनीच त्यांना बहाल केली. महागाईच्या प्रश्नावर त्यांनी उगारलेले लाटणे हे तर त्या काळातील महिला आंदोलनांचे प्रतीक बनले. विधानसभा, लोकसभेत काम करतानाही सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या आंदोलकाची त्यांची भूमिका कायम राहिली. (Mrunal Gore information in marathi)

मृणाल गोरे या नावाभोवती असलेले वलय हे निव्वळ करिष्म्यापोटी नव्हते, तर प्रत्यक्ष जनसंपर्क, जिव्हाळा यातून तयार झालेले होते. राजकारणातून आदर्शवाद हरवत चाललेल्या आजच्या या काळात मृणालताईंचं मोठेपण उठून दिसतं. सामान्य माणसांच्या प्रश्नांची तड लावणे, त्यांना न्याय मिळवून देणे हेच ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांचे जीवनसूत्र होते. मृणालताईंचे वडील शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांच्या दोन बहिणी व एक भाऊ डॉक्टर होते. सारे कुटुंब, उच्चशिक्षित व सुसंस्कृत. मृणालताईही एक दिवस डॉक्टर होणार हे निश्चित होते. मात्र समाजवादी विचारांवरील अढळ निष्ठेमुळे मृणालताईंनी वैद्यकीय शिक्षण बाजूला ठेवत स्वत:ला जनआंदोलनात झोकून दिले व त्यांच्या जीवनाची दिशा बदलून गेली. समाजवादी नेते केशव गोरे यांच्याशी मृणालताई यांचा विवाह झाल्यानंतर त्या मुंबईतील गोरेगाव या उपनगरामध्ये राहावयास आल्या. पण दहा वर्षांच्या संसारानंतर केशव गोरे यांचे निधन झाले. मात्र इतकी मोठी शोकात्म घटना घडूनही मृणालताई खचल्या नाहीत.

त्यानंतर त्या सामाजिक कार्यात गढून गेल्या. त्यांच्या समाजकार्याचा हळूहळू विस्तार होत गेला. महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांच्या नावाचा विलक्षण दबदबा तयार झाला. गोरेगाव ग्रामपंचायत, मुंबई महानगरपालिका, राज्य विधानसभा, लोकसभा या लोकशाही संस्थांत मृणालताईंनी पुढे अडीच दशके प्रतिनिधीत्व केले. इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीविरोधात ताईंनी जोरदार आवाज उठविला. या लढय़ात त्या प्रारंभी भूमिगत राहून कार्य करीत होत्या. नंतर त्यांना अटक झाली. तुरुंगवास भोगावा लागला. मृणालताई राष्ट्र सेवा दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. कालांतराने त्या संस्थेच्या मार्गदर्शक नेत्यांपैकी एक बनल्या. पाणीटंचाई, महागाईपासून सामान्य माणसाला भेडसावणार्‍या अनेक प्रश्नांसाठी रणरागिणी होऊन त्यांनी रस्त्यावर उतरून लढा पुकारला. महागाईविरोधात त्यांनी काढलेला लाटणे मोर्चा खूप गाजला. पाणीटंचाईच्या परिस्थितीचे गांभीर्य सरकारला लक्षात आणून देण्यासाठी ताईंनी अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले. त्यामुळे ‘पाणीवाली बाई’, ‘लाटणेवाली बाई’ अशा सार्थ शब्दांत त्यांचा गौरव झाला.

१९७२ मध्ये मालाड मतदारसंघातून त्या प्रथम विधानसभेवर निवडून गेल्या. आणीबाणीविरोधातील लढय़ात झंझावातासारखे त्यांचे कार्य देशभरातील महिला कार्यकर्त्यांना स्फूर्तिदायी ठरले. १९७७ मध्ये मृणालताई प्रथमच लोकसभेवर गेल्या. ताई कोणत्याही सभागृहाच्या सदस्या असोत तेथे त्यांनी सामान्य माणसांचे प्रश्न धसास लावण्याचा प्रयत्न केला. समाजवादी विचार केवळ बोलून दाखविण्यापुरता नाही तर प्रत्यक्षात यावा यासाठी त्यांचे सारे प्रयत्न असत. कमाल जमीन धारणा कायद्याच्या अन्वये गोरेगाव परिसरात नागरी निवारा परिषदेमार्फत जमीन मिळवून त्यावर गरीब, गरजू लोकांच्या खिशाला परवडतील अशी घरे बांधण्याचा अभिनव प्रकल्प मृणालताई गोरे व समाजवादी नेते प. बा. सामंत यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला. या प्रकल्पातून आजवर सहा हजार गरजू कुटुंबांना स्वत:ची हक्काची घरे मिळाली आहेत. १९८५ ते १९९० या कालावधीत मृणालताई गोरे या विधानसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यावेळी त्यांनी अत्यंत तडफेने सामान्य माणसांचे प्रश्न मांडले. केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फेही अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबविले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अलीकडच्या काळात त्या आंदोलनात सहभागी होत नसत, परंतु सामाजिक प्रश्नांवर लढा देणार्‍या कार्यकर्त्यांना त्या अखेरपर्यंत मोलाचे मार्गदर्शन देत राहिल्या. १७ जुलै २०१२ मध्ये त्यांचं निधन झालं.

– प्रतिक पुरी
माहिती संदर्भ : मराठी विश्वकोश