टीम हॅलो महाराष्ट्र । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी जुलै २०१९ पासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. धोनीनं शेवटचा समान विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला. बऱ्याच महिन्यापासून धोनी संघाबाहेर असल्याने त्याच्या निवृत्तीबाबत कयास लावले जात आहे. दरम्यान आज याबाबत एक महत्वाची बातमी समोर आहे.
बीसीसीआयने खेळाडूंसोबत केल्या जाणाऱ्या वार्षिक कराराच्या यादीतून धोनीला वगळले आहे. करारातील कोणत्याही यादीमध्ये त्यांचा समावेश केलेला नाही आहे. गेल्या वर्षी त्याला ए ग्रेड करार देण्यात आला होता. या ग्रेडमध्ये खेळाडूला बीसीसीआयकडून वर्षाकाठी ५ कोटी रुपये मिळतात. बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये धोनीचे नाव नसल्यामुळे आता त्यांची निवृत्ती अगदी जवळ असल्याचे संकेत मिळत आहेत. न्यूझीलंड दौर्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. अशा परिस्थितीत आता त्याच्याकडे केवळ आयपीएलमध्ये खेळण्याची संधी आहे. मात्र, टी२०विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या भारतीय संघात स्थान मिळण्याचा तो दावेदार असल्याचे सांगितले जाते आहे.
बीसीसीआय करारामध्ये चार गट आहेत ज्यांच्या अंतर्गत खेळाडूंचे विभाजन केले गेले आहे. ग्रेड ए + मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वर्षाकाठी सात कोटी रुपये दिले जातात आणि त्यामध्ये तिन्ही क्रिकेट फॉरमॅटचा समावेश आहे. ग्रेड ए च्या खेळाडूंना पाच कोटी रुपये दिले जातात. त्याच बरोबर ग्रेड बी मधील तीन कोटी आणि ग्रेड सी मधील खेळाडूंना एक कोटी रुपये दिले जातात. सध्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांची ग्रेड ए + मध्ये नावे आहेत.