Tuesday, January 7, 2025

धोनीने CSK चे कर्णधारपद सोडलं; मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यांवर धुरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।आयपीएल २०२४ ला उद्यापासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलुरू या दोन संघात उद्या आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. मात्र त्यापूर्वीच चेन्नईच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिह धोनी कर्णधार पदावरून पायउतार झाला आहे. त्याच्या जागी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यांवर चेन्नईची धुरा देण्यात आली आहे.

याबाबत CSK ने एक निवेदन जारी करून म्हटले कि, ‘एमएस धोनीने आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद रुतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. गायकवाड 2019 पासून चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे आणि या काळात त्याने आयपीएलमध्ये 52 सामने खेळले आहेत. या मोसमातील सलामीचा सामना शुक्रवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई आणि बेंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या तोंडावरच धोनीने अचानकपणे कर्णधारपद सोडल्याने त्याच्या चाहत्यांसाठी हि मोठी निराशाजनक बातमी आहे.

महेंद्रसिग धोनी म्हणजे चेन्नई आणि चेन्नई म्हणजे धोनी असं समीकरण आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आपण बघत आलोय. आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि कल्पक नेतृत्वाच्या जोरावर धोनीने चेन्नईला अनेक सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखालीच चेन्नई सुपर किंग्सने तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. आयपीएल मधील यशस्वी संघामध्ये चेन्नईचे नाव आवर्जून घेतलं जाते त्यामागे धोनीचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे धोनीने कर्णधारपद सोडणं चेन्नईसाठी वाईट बातमी म्हणावी लागेल.