मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे संपूर्ण जगभरात लाखो चाहते आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वामध्ये भारताने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. एमएस धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. टीम इंडियासाठी ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे एमएस धोनी खूप लोकप्रिय झाला होता. काही चाहते तर धोनीला देव मानतात. धोनीचे फॅन फॉलोइंग चांगले असले तरी त्याला काही वेळा ट्रोलर्स आणि टीकाकारांचा सामना करावा लागतो.
मैदानामध्ये नेहमी शांत असणाऱ्या धोनीचे व्यक्तीमत्व मनमौजी आहे. धोनी स्टम्पच्या मागून आपल्या खेळाडूंना दिलेले सल्ले अनेकवेळा चाहत्यांचे मनोरंजन करतात. सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये धोनीची गणना होते. सध्या धोनी सोशल मीडियापासून लांब आहे. पण एक वेळ अशी होती कि धोनी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असायचा. एवढेच नाही तर तो ट्रोलर्सने केलेल्या टीकेला प्रत्युत्तरदेखील द्यायचा. असेच धोनीचे 2012 सालचे एक जुने ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
या ट्विटमध्ये धोनीने ट्रोलरची बोलतीच बंद केली होती. जुलै 2012 साली भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर जाण्याअगोदर धोनीने दोन फोटो शेयर करत दोघांमधला फरक ओळखायला सांगितला होता. त्या फोटोवर एका ट्रोलरने धोनीला बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करायला सांगितले होते. त्यावर धोनीने या ट्रोलरलाच मला बॅटिंगच्या टिप्स दे असे प्रत्युत्तर दिले होते. धोनीचे हे जुने ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.