कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील मराठवाडी धरणाच्या जलाशय परिसरातील डोंगरात प्रचंड प्रमाणात भुसख्लन झाल्याने नदी व ओढ्यातून मोठ्या प्रमाणात तांबडी माती वाहून आली. यामुळे यावर्षी गढूळ पाण्याने धरण तुडुंब भरल्याचे वेगळेच चित्र दृष्टीला पडत आहे. या प्रकारामुळे धरणात गाळाचे प्रमाणही वाढण्याचीही चिन्हे आहेत.
वांगनदीवरील मराठवाडी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता 2.73 टीएमसी असली तरी तब्बल 24 वर्षे उलटूनही बांधकाम पूर्ण न झाल्याने सध्यस्थितीस त्यात 2 टीएमसीपर्यंतच पाणीसाठा करणे शक्य होत आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये अजूनही काही धरणग्रस्त कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्याशिवाय शेवटच्या टोकाला असलेल्या जिंती गावापर्यंत धरणातील पाण्याचा फुगवटा पोहचत असल्याने पावसाळ्यात जिंती-सावंतवाडी, जितकरवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडी,धनावडेवाडी आदी गावांना अडचणींशी सामना करावा लागत आहे.
यंदा अतिवृष्टीमुळे त्यापरिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने नदी, नाली व ओढ्यातून धरणात मोठ्या प्रमाणात माती वाहून आली. सध्या पावसाची उघडीप असली तरी नदी व ओढ्यातून जलाशयात गढूळ पाण्याची आवक सुरूच आहे. धरणात मोठ्या प्रमाणात माती वाहून आल्याने गाळाचे प्रमाण वाढणार आहे. पूर ओसरत असताना आता उघड्या पडलेल्या जलाशय परिसरात दिसणाऱ्या गाळाच्या ढिगाऱ्यातून हीच बाब स्पष्ट होत आहे. दरम्यान जलाशय परिसरात अजूनही डोंगर खचून दरडी कोसळतच आहेत. धोका निर्माण झाल्याने जिंती परिसरातील काही वाड्यावस्त्यातील नागरिकांना ढेबेवाडी व जिंती येथे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.







