Mugdha Godbole : मंगळसूत्र न घालण्याबाबत क्षिती जोगच्या वक्तव्यावर गलिच्छ कमेंट्स; प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mugdha Godbole) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्षिती जोगकडे पाहिले जाते. तिने आजवर मालिका, नाटक, चित्रपट, बॉलिवूड सिनेमांमध्ये साकारलेल्या विविध भूमिकांना प्रेक्षकांनी कायम प्रेम दिले आहे. क्षिती जितकी उत्तम अभिनेत्री तितकीच उत्तम निर्माती देखील आहे. शिवाय स्पष्ट आणि थेट बोलण्यासाठी ती ओळखली जाते. अलीकडेच तिने ‘आरपार’ नावाच्या युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली होती. ज्यामध्ये तिने मंगळसूत्र न घालण्याबाबत तिचं मत मांडलं होतं. या मुलाखतीचा एक टीझर लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने शेअर केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी अत्यंत विचित्र आणि पातळी सोडून कमेंट्स केल्या आहेत. याबाबत मुग्धाने संताप व्यक्त केला आहे.

मंगळसूत्र घालावं की नाही हा वैयक्तिक प्रश्न

अभिनेत्री क्षिती जोगने मंगळसूत्र घालावं की नाही? हा जिचा तिचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं या मुलाखतीत म्हटलं आहे. गुरुवारपासून हा व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या मुलाखतीदरम्यान मंगळसूत्राला क्षितीने ज्वेलरी म्हणून संबोधले आहे. ज्यावरून तिला प्रचंड ट्रोल केलं जातंय.

काही नेटकऱ्यांनी अगदी गलिच्छ, खालच्या पातळीवर जाऊन असभ्य भाषेत कमेंट्स केल्या आहेत. याबाबत मुग्धा गोडबोले यांनी संताप दर्शवणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

मुग्धा गोडबोले यांची फेसबुक पोस्ट (Mugdha Godbole)

मुग्धा गोडबोले यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, ‘हे रील नेहमीप्रमाणे मी instagram वर पोस्ट केलं. शनिवारी एपिसोड येणार, गुरुवारपासून त्याचं प्रमोशन सुरू होतं. हा व्यवसायाचा भाग आहे. मुद्दा हा आहे की instagram वर ह्या रील खाली साधारण ३०० च्या वर कॉमेंट्स आहेत आणि त्यातल्या बहुतेक पुरुषांच्या आहेत. त्या अत्यंत गलिच्छ भाषेत, घाणेरड्या पद्धतीने लिहिलेल्या आणि अश्लील अश्लाघ्य आणि बीभत्स आहेत. (Mugdha Godbole) आश्चर्य वाटावं का नको असाही आता प्रश्न पडतो. क्षितीच्या पिढीतल्या अनेक बायका रोज घराबाहेर पडताना मंगळसूत्र घालत नाहीत. त्याला अनेक कारणं आहेत. आवडत नाही, चोरांची भीती वाटते वगैरे अनेक’.

पुढे म्हटलंय. ‘प्रश्न हा आहे की गळ्यात मंगळसूत्र घालावं का नाही हा त्या स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न असावा का? का नाही? इतक्या बेसिक मुद्द्यावर आपण अजूनही एवढी चर्चा करतो??? इतक्या घाणेरड्या comments करणारे पुरुष घरात आपल्या बायकांकडून काय काय अपेक्षा करत असतील?? आम्ही दैनंदिन मालिकांमध्ये जेव्हा असं काही लिहितो तेव्हा कुठल्या काळात जगता आहात, आता हे प्रश्न नाहीयेत लोकांचे वगैरे म्हणणाऱ्या सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की ते कॉमेंट्स वाचा. काळ बदलला आहे. विचार नाहीत. खूप मोठ्या प्रमाणावर बदललेले नाहीत. कित्येक कॉमेंट्स आम्ही डिलीट केल्या आहेत. कराव्या लागल्या’. (Mugdha Godbole) मुग्धा गोडबोले यांच्या पोस्टवर अनेक स्त्रियांनी कमेंट्स करत आपले मत नोंदवले आहे. यामध्ये क्षिती आणि मुग्धा यांच्या विचारांना सर्वाधिक सहमती मिळाली आहे.