हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Airport । मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी म्हणजेच २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या ६ तासांमध्ये सर्व धावपट्टीचे कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. जागतिक विमान वाहतूक मानकांचे पालन, सुरक्षितता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी नियोजित धावपट्टी बंद करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (MIAL) सांगितले.
विमानतळ बंद ठेवणे पूर्वनियोजित – Mumbai Airport
दरवर्षीच्या पावसाळ्यानंतरच्या देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा हा नियोजित कार्यक्रम आहे. या कालावधीत उड्डाण वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाने ६ महिन्यांपूर्वीच याची कल्पना सर्व विमान वाहतूक कंपन्यांना दिली होती. जेणेकरुन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. त्यानुसार, विमान कंपन्यांनी नियोजन केले आहे. परंतु रनवे काही तासांसाठी बंद राहणार असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीमध्ये तपासणी, धावपट्टीवरील लाइट्स, मार्किंग आणि ड्रेनेश सिस्टीमचे तांत्रिक मूल्यांकन यांचा समावेश असणार आहे.
मुंबई विमानतळ देशातील महत्वाचे विमानतळ –
मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दोन छेदनबिंदू धावपट्टी आहेत, मुख्य धावपट्टी ९/२७ आणि दुय्यम धावपट्टी १४/३२, ज्याठिकाणी दररोज ९५० पेक्षा जास्त उड्डाणे होतात. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मोठं आणि महत्वाचे विमानतळ म्हणून ओळखले जाते. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून मुंबईकडे बघितलं जाते. दर चार मिनिटाला मुंबई विमानतळावर विमान लॅंन्ड होते आणि टेकऑफ होते. जगभरातील जवळपास सर्वच देशात मुंबई विमानतळावरून उड्डाण होते.
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू करेल. त्याठिकाणी सुरुवातीला दररोज २३ वेळा उड्डाणे होतील. पहिल्या महिन्यात, विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत १२ तासांसाठी कार्यरत राहील, दररोज २३ वेळा उड्डाणे होतील. या कालावधीत, विमानतळ प्रति तास १० वेळा उड्डाणे करेल.




