मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी अद्याप संशोधन नझालेल्या काँग्रेसला आता मुंबईत दोन कार्यध्यक्ष आणि एक अध्यक्ष नेमण्याचीही इच्छा झाली आहे. संघटन बांधणीसाठी कार्याध्यक्ष नेमणे गरजेचे असते असा साक्षात्कार काँग्रेसला नव्याने झाला आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात पाच कार्याध्यक्ष नेमले आहेत. त्याच प्रमाणे मुंबईच्या अध्यक्ष पदी मिलिंद देवरा कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबई अध्यक्ष पदी मिलींद देवरा यांची निवड कायम राहणार असून त्यांच्या जोडीला दोन कार्याध्यक्ष देखील दिले जाणार आहेत. त्यांच्या जोडीला एकनाथ गायकवाड आणि हुसेन दलवाई यांची कार्यध्यक्ष पदी निवड केली जाणार आहे. एकनाथ गायकवाड हे दलित आहेत आणि हुसेन दलवाई हे मुस्लिम असल्याने त्यांची या पदी निवड करून काँग्रेस सोशल इंजिनेरिंग करण्याचा प्रयत्न करत आहे.
काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड करून पाच कार्याध्यक्ष त्यांच्या जोडीला दिले आहेत. यात विश्वजीत कदम, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, मुज्जफर हुसेन यांचा समावेश होतो. या पाच कार्याध्यक्षाच्या निवडी बरोबरच काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाची देखील विभागणी केली आहे.जाहीरनामा समितीच्या अध्यक्ष पदी पृथ्वीराज चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले हे असणार आहेत.