मुंबई । मुंबई क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. NDPS च्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात आणखी एक आरोपी नुपूर सतीजा हिला जामीन मंजूर करताना सांगितले की,’तिच्याकडून कथित ड्रग्जची जप्ती बेकायदेशीर आहे.’ न्यायालयाने म्हटले आहे की नुपूर सतीजाकडून ड्रग्सची जप्ती NCB च्या कोणत्याही अधिकाऱ्याने नाही तर अन्य एका महिलेने केली आहे, जी पूर्णपणे बेकायदेशीर आहे.’ बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि नुपूर सतीजा यांच्यासह 20 जणांना क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. नुपूरला 30 ऑक्टोबरलाच जामीन मिळाला, मात्र कोर्टाचा संपूर्ण आदेश शनिवारी सार्वजनिक करण्यात आला.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर छापा टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 20 जणांना अटक केली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नुपूर सतीजा हिला 30 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला होता. NCB ने नुपूरकडून चार एक्स्टसी बुलेट जप्त केल्याचा आरोप केला होता. विशेष न्यायाधीश व्हीव्ही पाटील म्हणाले की,”नुपूर सतीजा हिचा पंच महिला साक्षीदाराने शोध घेतला होता. तिच्यासोबत अन्य कोणतीही महिला अधिकारी उपस्थित नव्हती. आरोपींकडून बुलेट्स जप्त झाल्यानंतर अधिकृत व्यक्तीने कोणताही पंचनामा केला नाही.” न्यायालयाने पुढे म्हटले आहे की,’या संपूर्ण प्रकरणात NDPS कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करण्यात आले आहे.’
मुंबईच्या किनार्याजवळील एका क्रूझ जहाजावर रेव्ह पार्टीवर छापा टाकून तेथून अंमली पदार्थ मिळवल्याच्या प्रकरणातील एका साक्षीदाराने आरोप केला आहे की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शाहरुख खानबरोबर त्याचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी डील केली होती. प्रभाकर साईल या साक्षीदाराने विविध टीव्ही चॅनेल्सवर उघडपणे सांगितले की,NCB चे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे. मात्र, NCB ने हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.
साक्षीदार प्रभाकरने प्रतिज्ञापत्रात काय म्हटले आहे
साक्षीदार प्रभाकर साईलने त्यांच्या एका प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की, तथाकथित प्रायव्हेट डिटेक्टिव्ह केपी गोसावी आणि सॅम डिसोझा यांच्यात 18 कोटी रुपयांच्या कराराबद्दल त्याने ऐकले होते, त्यापैकी 8 कोटी रुपये NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते. केपी गोसावीकडून सॅम डिसोझाने पैसे घेतल्याचा दावाही प्रभाकरने केला आहे.