व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Mumbai Drugs Case : सॅम डिसोझा SIT समोर हजर, NCB ने आधीच केली आहे चौकशी

मुंबई । क्रूझ शिप अंमली पदार्थ प्रकरणी सॅम डिसोझा सोमवारी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर झाला. या प्रकरणात डिसोझाचे नाव पेमेंटच्या आरोपात पुढे आले होते. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला गेल्या महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) एका क्रूझ शिपवर छापा टाकून जहाजावरील ड्रग्ज जप्त केल्याचा दावा केल्यानंतर अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साईलने गेल्या महिन्यात दावा केला होता की, NCB ने आर्यन खानला अटक केल्यानंतर NCB चा साक्षीदार केपी गोसावीने डिसोझासोबत 25 कोटी रुपयांच्या पेमेंट डीलबाबत फोनवर चर्चा करताना ऐकले होते. या प्रकरणाशी संबंधित NCB अधिकार्‍यांवर झालेल्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी नंतर SIT स्थापन केली.

सोमवारी, डिसोझाचे वकील पंकज जाधव याच्यासह त्याचे स्टेटमेंट नोंदवण्यासाठी दुपारी 12:45 वाजता दक्षिण मुंबईतील SIT च्या कार्यालयात पोहोचले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. NCB च्या दक्षता पथकाने, जे क्रूझ अंमली पदार्थ प्रकरणात पैसे भरल्याच्या आरोपांची चौकशी करत आहेत, त्यांनी डिसोझाचे स्टेटमेंट आधीच नोंदवले आहे.

याआधी डिसोझाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेत दावा केला होता की, आर्यन खानची सुटका करण्यासाठी गोसावीने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीकडून 50 लाख रुपये घेतले होते. या प्रकरणी NCB ने आर्यन खानला तीन ऑक्टोबर रोजी अटक केल्यानंतर ही रक्कम परत करण्यात आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. आर्यन खानकडे कुठलेही अंमली पदार्थ सापडले नाही आणि प्रत्यक्षात तो निर्दोष असल्याचे गोसावीने सांगितले होते.