मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका माजी महिला पत्रकाराने आपल्या 7 वर्षाच्या मुलासह उडी घेतली आहे. या महिलेने चांदिवलीच्या नहरे अमृत शक्ती निवासी परिसरातील टिलिपिया इमारतीच्या 12 मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. २३ मे रोजी कोविडमुळे या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. पतीचे नाव सैराट मुलुकुतला असे आहे तर आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव रेश्मा आहे. आपल्या पतीच्या निधनामुळे रेश्मा ही नैराश्यात होती. या महिलेचा पती सैराट हा शेतीसंबंधित वस्तूंच्या ऑनलाइन व्यापार यात मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून काम करत होता.
रेश्माने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये तिने रेश्मा राहत असलेल्या इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबाविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पण अजून कोणाला अटक केली नाही. रेश्मा आणि तिचा पती आपल्या मुलासह 10 एप्रिल रोजी नवीन फ्लॅटमध्ये राहायला गेले. तेव्हापासून आरोपी कुटुंबियांसोबत त्यांचे मतभेद होते. मुलाच्या आवाजाच्या होणाऱ्या त्रासामुळे आरोपी कुटुंबियांनी याआधी इमारतीच्या सोसायटीकडे अनेकदा तक्रारदेखील केली होती. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस आयुक्त महेश्वर रेड्डी आणि सहायक पोलीस आयुक्त यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि या प्रकरणाच्या पुढील कारवाईसाठी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रेश्माने लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी त्या कुटूंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोमवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास हि घटना घडली.