मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईच्या मालवणी पोलिसांनी मालवणी परिसरात गे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या परिसरात गे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हि टोळी एका ऑनलाईन डेटिंग गे अॅपद्वारे हे सेक्स रॅकेट चालवत होते. आरोपी ग्रिंडर हा मोबाईल अॅपद्वारे समलिंगी समाजाच्या तरुणांशी संपर्क साधायचे. यानंतर आरोपी त्या तरुणांना त्यांच्या मालवणी परिसरातील कार्यालयात किंवा घरी सशक्त तरुण पुरविण्याची हमी द्यायचे. अखेर आज गे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इरफान फुरकान खान, अहमद फारुखी शेख, इम्रान शफीख शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अशाप्रकारे झाला या रॅकेटचा खुलासा
आरोपींनी गे डेटिंग अॅपद्वारे अकाउंटट म्हणून एका कंपनीत काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला आपल्या जाळ्यात अडकवले. पीडित तरुणाने गे डेटिंग अॅपवर आपला इंटरेस्ट दाखवला होता. आरोपींनी या तरुणाला एका तासाचे 1 हजार रुपये लागतील, असे सांगितले होते. तशी डीलसुद्धा झाली होती. ठरल्याप्रमाणे पीडित तरुण हा आरोपींच्या मालवणी येथील कार्यालयात गेला. पीडित तरुण हा रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मालवणी येथील एका मैदानाजवळ पोहोचला होता. डीलमध्ये ठरल्याप्रमाणे आरोपी इरफान खान हा पीडित तरुणासोबत शरीरसंबंध ठेवणार होता. पण खान हा कामात व्यस्त होता. त्यामुळे त्याने त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याला सांगितले पण तोदेखील कामात व्यस्त होता. त्यामुळे खानने त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांना याबाबत सांगितले.
यादरम्यान पीडित तरुण आरोपींच्या ऑफिसात दाखल झालेला होता. तो तिथे आपल्या सेक्स पार्टनरची वाट पाहत होता. काही वेळानंतर त्या ठिकाणी चारजण आले. यानंतर त्या चौघांनी एकत्र पीडित तरुणासोबत शारिरीक संबंध ठेवण्याचा हट्ट केला. पण तरुणाने त्यांची ती मागणी नाकारली. त्यानंतर या चारही आरोपींनी रागाच्या भरात पीडित तरुणाला प्रचंड मारहाण केली. यानंतर आरोपींनी पीडित तरुणाकडून त्याचा मोबाईल, पाकिट आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या. हे आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणाच्या अंगावरील कपडे काढून त्याचा न्यूड व्हिडीओ बनवला. तसेच तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. तरुणाने आपण पैसे घेऊन येत असल्याचा बहाणा करत तिथून कशीतरी सुटका करुन घेतली. यानंतर पीडित तरुणाने हा सगळा प्रकार त्याच्या कुटुंबियांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांची प्रतिक्रिया
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सिनिअर पोलीस इन्सपेक्टर शेखर भालेराव आणि हसन मुलानी यांच्या पथकाने या प्रकरणी तातडीने कारवाई करून तीन आरोपींना अटक केली आहे. आम्ही सर्व आरोपींच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच त्यांना कोर्टात हजार केले असता कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.