हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा मानल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL) 31 मार्चपासून सुरू होणार आहे. 2008 पासून सुरु झालेल्या आयपीएलचा संपूर्ण इतिहास पाहिला तर आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या संघाने आत्तापर्यंत तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा चषकावर नाव करणारा मुंबईचा संघ आहे. परंतु यंदा मुंबईसाठी आव्हान सोप्प नसेल. मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती आणि T20 स्पेशालिस्ट सूर्यकुमारचा खराब फॉर्म यामुळे रोहित शर्मापुढे सुरुवातीपासून अडचणी वाढल्या आहेत.
जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा मुख्य गोलंदाज मानला जातो. अचूक लाईन आणि लेन्थ तसेच डेथ ओव्हर मधील आपल्या दमदार यॉर्कर साठी बुमराह ओळखला जातो. अनेकदा त्याने अत्यंत अटीतटीच्या सामन्यात मुंबईला विजय मिळवून दिला आहे. परंतु पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. बुमराह यंदाच्या आयपीएल मध्येही भाग घेणार नाही त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का आहे. तर दुसरीकडे T20 स्पेशालिस्ट स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म हा सुद्धा मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. नुकतंच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार सलग 3 सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यामुळे त्याच्या नावावर लाजिरवाणा विक्रम झाला. परंतु सूर्यकुमार हा स्टार खेळाडू आहे, तो लवकरात लवकर फॉर्मात यावा अशीच मुंबईच्या चाहत्यांची इच्छा असेल.
2 एप्रिलला मुंबईचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर बंगलोर विरुद्ध असेल. यावेळी मुंबईच्या अंतिम 11 मध्ये कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश होईल हे नक्की सांगता येत नाही. परंतु सलामीला कर्णधार रोहितसोबत ईशान किशन येऊ शकतो. मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, दक्षिण आफ्रिकेचा बेबी एबी डेवाल्ड ब्रेविस, युवा फलंदाज टीलक वर्मा असतील तर शेवटच्या ओव्हर मध्ये गोलंदाजांची पिसे काढायला टीम डेव्हिड सुद्धा आहे. मुंबईची गोलंदाजी त्या तुलनेत थोडीशी सुमार वाटतेय. बुमराहच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांच्यावर गोलंदाजीची मुख्य धुरा असेल. गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या ताफ्यात असलेला सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंदुलकर याचा यंदा तरी अंतिम ११ मध्ये समावेश होईल का हे पाहणंही महत्त्वपूर्ण असेल.