हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबई लोकल मधून प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी व्हावा आणि त्यांना गारेगार प्रवासाचा आनंद मिळावा यासाठी रेल्वेने एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईकरांना आता १८ डब्यांची एसी लोकल मिळणार आहे. हि लोकल ट्रेन वंदे मेट्रो सारखी असेल. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे २,८५६ वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि दीर्घकालीन देखभालीसाठी ई-निविदा जाहीर करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मुंबई लोकल ट्रेनचा चेहरामोहराच बदलणार आहे.
२ नवीन डेपोही उभारणार – Mumbai Local Train
सध्या मुंबईत मुख्यतः १२ आणि काही ठिकाणी १५ डब्यांच्या लोकल धावतात. मात्र, नवीन AC लोकल ट्रेन १२, १५ आणि १८ डब्यांची असेल. पुढील ७ ते ८ वर्षांत मुंबई उपनगरीय सेवेत कमीत कमी २३८ AC लोकल ट्रेन उपलब्ध होतील. या लोकलमुळे (Mumbai Local Train) मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायी आणि वेगवान होणार आहे. १२/१५/१८ डब्याच्या AC लोकल ट्रेनच्या कॉन्फिगरेशनमध्ये ३५ वर्षे देखभाल केली जाईल, ज्यामध्ये MUTP-III आणि MUTP-3A अंतर्गत दोन नवीन देखभाल डेपोची स्थापना करण्यात येईल असे MRVC ने एका निवेदनात म्हटले आहे. मध्य रेल्वेवरील भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवरील वाणगाव येथे हि २ नवीन डेपो तयार केले जातील.
मार्चमध्ये, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती की, मुंबई उपनगरीय नेटवर्कसाठी २३८ वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेन खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. “मी महाराष्ट्रात होतो आणि मुंबई लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) सुधारणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. आम्हाला आनंद होत आहे की २३८ नवीन लोकल ट्रेन खरेदीला अखेर मंजुरी देण्यात आली आहे,” असे वैष्णव यांनी संसदेत सांगितले होते. अखेर आता याबाबत निविदा काढण्यात आली असून रेल्वेमंत्र्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे. ही निविदा सादरीकरण ८ डिसेंबरपासून सुरू होईल आणि निविदा उघडण्याची तारीख २२ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली. ही निविदा मेक इन इंडिया धोरणानुसार राबवली जाणार आहे. ज्यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि तंत्रज्ञानाला चालना मिळेल.




