हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई लोकलला (Mumbai Local Train) जीवनवाहिनी असेही म्हणतात… दररोज तब्बल ७० ते ८० लाख मुंबईकर लोकलने प्रवास करतात. यामध्ये महिला प्रवाशांचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. अनेकदा महिलांना रात्रीच्या वेळेस रेल्वेने प्रवास करावा लागतो आणि त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. यावर ठोस मार्ग काढण्यासाठी रेल्वे विभागाने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार,महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनच्या प्रत्येक महिला डब्यात सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसविण्यावर भर दिला आहे. जूनअखेरीस मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनच्या प्रत्येक महिला डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खरं तर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी (Womens Security) मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) महिला डब्यांमध्ये पोलिस तैनात असतात , परंतु सध्याच्या या जगात आधुनिक पद्धतीची सुरक्षा व्यवस्था असावी अशी मागणी सातत्याने महिला प्रवाशांकडून मांडली जात होती. यापूर्वी रेल्वे प्रवासी संघटनांनी लोकल गाड्यांमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसवण्यावर भर दिला होता. मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रत्येक स्थानकावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरी दोन्ही मार्गावरील उशिराने प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेसाठी पुरेशी यंत्रणा आवश्यक होती. त्यानुसार महिलांच्या डब्यातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे आता महिलांचा डब्यात आता कडेकोट सुरक्षा असणार आहे.
जूनपर्यंत मिळणार सर्व सुविधा – Mumbai Local Train
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील एकूण 771 महिला डब्यांपैकी 594 डबे टॉकबॅक प्रणालीने बसवण्यात आले आहेत. येत्या ३० जूनपर्यंत उर्वरित डब्ब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. महिलांच्या डब्यात आग लागल्यास किंवा अपघात झाल्यास महिला प्रवासी या प्रणालीद्वारे मोटरमनला घटनेची माहिती देऊ शकतात.
याशिवाय महिलांच्या 771 डब्यांपैकी 606 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित महिलांच्या डब्यांमध्ये ३० मेपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मध्य-हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलच्या प्रत्येक महिला डब्यात सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा बसविण्याचे काम दीड वर्षांपासून सुरू आहे. एकूणच काय तर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे विभाग ऍक्शन मोडवर आला आहे.