हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । पश्चिम रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकलच्या एका मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यात करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (एचसी) निर्देशानंतर पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जेष्ठ नागरिकाने लोकल ट्रेनमध्ये आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येईल. तसेच रेल्वे मध्ये चढताना आणि उतरताना होणाऱ्या अपघातापासूनही सुटका मिळेल.
दररोज 50000 हून अधिक वृद्धांचा लोकलने प्रवास – Mumbai Local Train
गेल्या काही वर्षांत लोकलमध्ये (Mumbai Local Train) प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये दररोज ५०,००० हून अधिक वृद्ध लोक प्रवास करतात. सध्या, पश्चिम रेल्वेच्या इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयू) उपनगरीय गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी १४ आसने आहेत, चर्चगेट बाजूने तिसऱ्या आणि १२ व्या डब्यात प्रत्येक बाजूला ७. मात्र ते प्रवाशांच्या संख्येसाठी पुरेसे नाहीत. त्यामुळे रेल्वे बोर्डाने चर्चगेट बाजूने असलेला सामानाचा डब्बा तो सातव्या नंबरला आहे त्याचे रूपांतर एका विशेष ज्येष्ठ नागरिक डब्यात करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. प्रत्येक नूतनीकरण केलेल्या डब्यात १३ आसने आणि ९१ प्रवाशांसाठी उभे राहण्याची जागा असेल. यामुळे गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना सहजपणे लोकलमध्ये चढता व उतरता येईल. हे बदल टप्प्याटप्प्याने 105 सामान्य लोकलच्या डब्यांमध्ये केले जातील. एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या प्रकल्पाचा खर्च ५.४ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
या कामाच्या निविदा आधीच मागवण्यात आल्या आहेत आणि काम सुरू झाल्यापासून एका वर्षाच्या आत पूर्ण होण्याची शक्यता आहे,” असे पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनीत अभिषेक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. लोकल ट्रेन (Mumbai Local Train) मधील या नव्या बदलामुळे जेष्ठ नागरिकांना फक्त केवळ आरामदायी प्रवासच मिळणार नाही तर त्यांची सुरक्षाही मजबूत राहील. खास करून जेव्हा ट्रेन मध्ये गर्दी वाढते तेव्हा जेष्ठ नागरिकांना अडचण होत असते, अशावेळी हा नवीन विशेष डब्बा जेष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरेल.




