हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : फोन टॅपिंग प्रकरणी चौकशीसाठी टाळाटाळ करणाऱ्या राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अखेर जबाब नोंदवण्यात मुंबई सायबर सेलच्या टीमला यश आले आहे. मुंबई सायबर सेल टीमने हैदराबाद येथील घरी जाऊन रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे जबाबात शुक्ला यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
यापूर्वी दोन वेळा सायबर कडून चौकशीला हजर राहण्यास संदर्भात रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले होते. पण दोन्ही वेळेला कोरोनाचे कारण देऊन शुक्ला यांनी टाळाटाळ केली होती. तर ई-मेल द्वारे प्रश्न पाठवावे त्याचे उत्तर देते. अशी मागणीही शुक्ला यांनी केली होती. एवढेच नव्हे तर पोलिस अधिकारी चौकशीला बोलवत असल्यामुळे रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद हायकोर्टात धाव घेतली होती. आपल्याला चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्यामुळे चौकशी अधिकारी आपला छळ करतात असा आरोप रश्मी शुक्ला यांनी केला होता. पण आता मुंबई सायबर सेलने अखेर रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. याबाबत पुढील चौकशी सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या सध्या हैदराबाद येथे अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. दरम्यान एम एस आयडी मध्ये कार्यरत असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केले आहेत असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत पोलिस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते असा आरोप केला होता तसेच त्यांनी एका अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता एवढंच नाही तर याचा पुरावा केंद्रीय गृह सचिवांकडे देण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी केली असता लक्ष्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लिक झाल्याचे निदर्शनास आलं होतं. एवढंच नाही तर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती पण त्याचा गैरवापर केला. शुक्ला यांनी रितसर फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणांमध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टाईप केले आहे. असा आरोप काही मंत्र्यांनी केलाय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल गंभीर आरोप सुद्धा केले आहेत रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले आहेत.
शिरूर चे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकासआघाडी मध्ये न जाता भाजपबरोबर राहावे यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचा देखील प्रयत्न केला होता असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.