हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या अतरंगी कपड्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी उर्फीला नोटीस पाठवली आहे. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी अंबोली पोलिसांकडून ही नोटीस देण्यात आली असून उर्फी जावेद आज चौकशीसाठी हजर राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात चित्रा वाघ विरुद्ध उर्फी जावेद असा सामना सुरु आहे. उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही असं म्हणत चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली. याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. अखेर पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दाखल घेत उर्फीला नोटीस पाठवली आहे. उर्फीला आजच हजर होण्यास सांगितलं असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उर्फीने सुद्धा एकामागून एक ट्विट करत चित्रा वाघ याना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. उर्फी जावेदने काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचीही भेट घेतली होती. मात्र आज तिलाच मुंबई पोलिसांची नोटीस आल्यामुळे उर्फीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.




