हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला मुसळधार पावसाने (Mumbai Rain) झोडपलं आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील जनजीवन यामुळे विस्कळीत झालं असून रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे. आजही मुंबईत धुव्वाधार पावसाची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यानंतर सर्व एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. सध्या फक्त सकाळच्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. यानंतर पावसाचा अंदाज घेऊन दुसऱ्या सत्रातील म्हणजे दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल. असं मुंबई महानगरपालिका प्रशासनकडून सांगण्यात येत आहे. मुंबईत जे नोकरी करतात त्या नोकरदारांना सुद्धा घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत – Mumbai Rain
दरम्यान, या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. भांडुप रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.कोल्हापूर ते मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस तब्बल दीड तासांपासून रेल्वे रुळावर आहे. पुण्याकडे अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द केल्याची माहिती आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोणताही सिग्नल न मिळालाने एकामागे एक लोकल गाड्या उभ्या आहेत. पुढील काही तास पावसाचा जोर (Mumbai Rain) कायम राहिल्यास मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचून चक्काजाम होण्याची दाट शक्यता आहे.