नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन त्यांना फाशीच द्यावी; मुंबई बलात्कार प्रकरणानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

devendra fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू ओढवला. या दुर्दैवी घटनेनंतर संबंधित नराधमांवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करुन त्यांना फाशीच झाली पाहिजे, असं मत राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि त्यानंतर पीडितेचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. गेल्या महिन्याभराच्या काळात बलात्काराच्या घटना होत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच, या घटना मुंबईत असुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालून तातडीनं मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलून एक विशेष जलदगती न्यायालय स्थापन करुन यात खटला चालवला जाईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण न्यावं आणि त्या माध्यमातून आरोपींना शिक्षा व्हायला हवी. अशा आरोपींना फाशीच व्हायला हवी”, असं फडणवीस म्हणाले.