व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पारबंदर प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून प्रत्यक्ष जोडणी; देशातील सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू ठरणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ते नवी मुंबई अंतर आता केवळ २० मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत मुंबई आणि नवी मुंबई शहराची जोडणी पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन आहे. हा प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा ठरेल आणि गेम चेंजर’ ठरेल असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तर हा सागरी सेतू म्हणजे केवळ सागरी सेतू नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा मार्ग आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पारबंदर प्रकल्पाची वैशिष्टये काय आहेत-

देशातील सर्वात लांब आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा पहिल्या समुद्री पुलाचे मुंबई ते मुख्य भूमी (mainland) पर्यंतचे जमिनीवरील तसेच समुद्रातील २२ किलोमीटरचे बांधकाम पूर्ण झाले आहेत.

प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २२ कि.मी. लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका २ आपात्कालीन मार्गिका) पुलाचा समावेश आहे

या पुलाची समुद्रातील लांबी + सुमारे १६.५ कि.मी. असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ कि.मी. आहे.

या पुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील (mainland) शिवाजी नगर व राष्ट्रीय महामार्ग-४ब वर चिर्ले गावाजवळ दिले आहेत आंतरबदल (Interchanges).

मुंबई पारबंदर प्रकल्पातील पॅकेज १ व पॅकेज २ मधील प्रत्येकी ६५ ते १८० मी. लांबीच्या एकूण ७० गाळ्यांची ऑर्थोट्रोपिक स्टील डेक (Orthotropic Steel Deck) पद्धतीच्या सुपरस्ट्रक्चरची उभारणी करण्यात आली.

उभारणीचे हे काम वैशिष्ट्यपूर्ण अशा तंत्रज्ञान, उपक्रमांद्वारे तसेच आव्हानात्मक परिस्थितीत पूर्ण केले .

तिसऱ्या टप्प्यात आता पाण्यावरील हा पूल आता जमिनीशी जोडला

अनुषंगिक सोयी, सुविधा, रस्ते व वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना, वेगवेगळ्या तांत्रिक बाबींची पुर्तता, माहिती फलक, सुशोभीकरण अशा अनेक गोष्टी पूर्ण झाल्यानंतर हा पारबंदर प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

मुंबई पारबंदर प्रकल्पाचे फायदे :

नवी मुंबई व रायगड जिल्हा या प्रदेशांचा भौतिक व आर्थिक विकास होणार.

नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण, तसेच मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पार्ट यांच्या दरम्यान वेगवान दळणवळण शक्य होणार आहे.

मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-गोवा महामार्ग यांमधील अंतर सुमारे १५ कि.मी. ने कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि अमूल्य वेळेची सुमारे एका तासाची बचत होण्यास यामुळे मदत होईल.

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार.