सांगली । इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामकरण करण्याबरोबरच अन्य तीस विषयांच्या मंजुरीसाठी आयोजित सर्वसाधारण सभाही गणपूर्तीअभावी रद्द केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी पुन्हा एकदा सभेला दांडी मारली. विकास आघाडीच्या अध्यक्षांसह चौघा नगरसेवकांनी धक्कादायकरीत्या सभेकडे पाठ फिरवली. ईश्वरपूर नामकरणसाठी आग्रही असणार्या शिवसेनेच्या आनंदराव पवार यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल संतापजनक प्रतिक्रिया तर विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली.
नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. ईश्वरपूर नामकरणाचा विषय पत्रिकेत असल्याने सभेला राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता होती. संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. गत सभेप्रमाणे राष्ट्रवादीचे सर्व सदस्य गैरहजर राहिले. शिवसेनेचे चार व नगराध्यक्षांसह विकास आघाडीचे 4 असे एकूण आठ जणच सभेला उपस्थित होते.
निशिकांत पाटील म्हणाले, आजच्या सभेतील 30 विषय शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. 80 टक्के विषय प्रशासनाचे आहेत. काही नगरसेवकांनी विषय दिले असून ते गैरहजर आहेत. या 30 विषयांपेक्षा महत्वाचे काम त्यांना लागले असेल. गणपूर्तीसाठी आवश्यक सदस्य उपस्थित नसल्याने सभा रद्द केल्याची घोषणा पीठासीन अधिकारी निशिकांत पाटील यांनी केली.